Blog at Jains - ‘जैन’, कृषी क्रांती आणि बदलत्या अर्थकारणातला ऋणानुबंध !
एखाद्या कंपनीची प्रगती ही आर्थिक ताळेबंदातील आकडेवारी आणि या अनुषंगाने भांडवल बाजारातील भावातील चढ-उतारांवर मोजण्याची जगरहाटी आहे. त्यांच्या प्रगतीशीलतेचे मापन करणार्या आणि सर्वसामान्यांना न समजणार्या विविध ‘रेटींग्ज’देखील आहेत. तर दुसर्या बाजूने संबंधीत कंपनी याच्या बदल्यात समाजासाठी काय करते? हेदेखील पाहिले जाते. मात्र ‘सीएसआर’ म्हणजेच ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’च्या पलीकडे एखादी कंपनी कोणत्या तरी सकारात्मक बदलात कशी हातभार लावू शकते हे वरकरणी दिसून येत नाही. जळगाव येथील जैन उद्योग समूहाने गत काही दशकांमध्ये स्थानिक पातळीवर केलेल्या प्रयत्नांचा असाच एक अफलातून अनुभव मला अवचितपणे आला. आज याबाबतच!
न्हावी (ता. यावल) येथील प्रगतीशील शेतकरी टेनूदादा बोरोले हे अलीकडेच त्यांच्या सुपुत्राच्या विवाहाची पत्रिका देण्यासाठी सपत्नीक ‘जनशक्ति’च्या कार्यालयात आले होते. भरपूर गप्पा झाल्या. खेड्यातील एक साधारण चहा टपरी चालविणार्या टेनू डोंगर बोरोले यांची जीवनकथा अत्यंत विलक्षण अशीच आहे. चहाच्या टपरीपासून सुरू केलेला व्यवसाय त्यांना एका लोकप्रिय हॉटेलपर्यंत घेऊन गेला. मात्र त्यांना आपला पारंपरिक शेती व्यवसायच खुणावत होता. यामुळे एक दिवस प्रचंड भरभराटीस आलेली हॉटेल विकून त्यांनी थेट शेताचा रस्ता धरला. आज सुमारे तीन दशकानंतर टेनूदादा हे शेतीतील एक मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून गणले जातात. उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यातील अग्रगण्य शेतकर्यांमध्ये गणना होणारे बोरोले हे शेतीतील विविध प्रयोगांसाठीही ख्यात आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची अगदी बीबीसीनेही दखल घेतली आहे. यातील काही बाबींना आमच्या गप्पांमधून पुन्हा उजाळा मिळाला. बोरोले दाम्पत्य गेल्यानंतर त्यांनी दिलेली पत्रीका निरखून पाहिली असता मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. यात बोरोले कुटुंबानेकुलदेवता म्हाळसाई व खंडेरायाच्या आशीर्वादासह आयुष्यात जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाची कास धरल्याने आयुष्याला समृध्द वळण मिळाल्याचे ठळकपणे नमूद केले आहे. विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेत कुणीही गोतावळ्यासह आपल्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींचा आवर्जुन उल्लेख करत असतो. मात्र कुलदेवतेसोबत एखाद्या कंपनीचे नाव टाकण्याचा प्रकार हा माझे कुतुहल चाळवणारा ठरला. या संदर्भात थेट टेनूदादांशी बोलणे केले असता त्यांनी बरेच काही भरभरून सांगितले.
खरं तर जैन कंपनी आणि श्री. बोरोले यांच्यातील संबंध हे व्यावसायिक स्वरूपाचे म्हणजेच कंपनी आणि ग्राहक असे आहेत. आजही ते कंपनीच्या मोठ्या ग्राहकांपैकी आहेत. मात्र याच्याही पलीकडचे नाते गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त कालखंडात निर्मित झाल्याचे बोरोलेदादांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, “माझ्या घरी जराही शेती नव्हती. अगदी शून्यातून शेतीची सुरूवात करत असतांना मला जैन कंपनीने आधुनिक कृषीचा मूलमंत्र दिला. त्यांच्या योग्य मार्गदर्शनानेच मी आजवरचा पल्ला गाठला आहे. अगदी पहिल्यापासूनच मी ‘जैन’तर्फे दिला जाणार्या सल्ल्याचे पालन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानेच मी आयुष्यात काही तरी करू शकलो आहे.” यामुळे आमच्या कुटुंबासाठी ‘जैन समूहा’चे स्थान कुलदेवतेसमानच असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले. व्यावसायिकतेच्या पलीकडे जाणारे हे उदाहरण ‘जैन समुहा’ने स्थानिक पातळीवर केलेल्या कृषी क्रांतीच्या बिजारोपणाच्या यशस्वीतेची ग्वाही देणारे ठरले आहे.खान्देशी भूमितला कृषी हिताचा हा ‘जैन’रूपी अंकुर वैश्विक पातळीवर वटवृक्षासमान बहरत असतांना याची फळे याच परिसराच्या कान्याकोपर्यात किती रसरशीतपणे चाखली जात आहेत याचे हे एक उत्तम उदाहरण नव्हे काय? जल, जमीन आणि एकंदरीतच चराचराच्या संगोपनाचा विचार करत शेतकर्यांना आधुनिकतेची कास धरण्यास शिकवणारे भवरलालभाऊ जैन यांची ‘कणापरी कल्पना’ ही ब्रह्मांडाचा भेद करणारी निश्चितच आहे. अर्थात या कल्पनेला वास्तवात साकारणार्यांनाही याचे लाभ मिळाले आहेतच. आणि या सर्वांना व्यापून असणारा ऋणानुबंध टेनूदादा बोरोले यांच्यासारखे प्रगतीशील व समृध्द शेतकरी जेव्हा अगदी कृतार्थतेने नमुद करतात तेव्हा यासाठी कौतुकाचे दोन शब्द क्रमप्राप्तच ठरतात.