Welcome to Jain Irrigation Systems Ltd.

 

Blog at Jains - ‘हो! भाऊ तिथेच आहेत, जिथे पाखरं पाणी पिताहेत...’

“कृषिसंस्कृतीत आनंद आहे, सृजन आहे, संवर्धन आहे. आई आणि भूमी यांच्यातील नवनिर्मितीचे तत्त्व वंदनीय आहे. आईला स्वत:च्या लेकरांकडे पाहताना आपण पहा किंवा हिरव्यागार पिकाला वार्‍यावर डोलताना धरणीमातेला होणारा आनंद संवेदनेने जाणून घ्या, असे पाहण्यात, असे जाणून घेण्यातच माणसाचे माणूसपण आहे!” आदरणीय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंचे हे उद्गार. ऋषभदेवांनी दिलेली कृषिसंस्कृती कृतिशीलपणे आचरणात आणणार्‍या जलतपस्वी भाऊंची शेतीमातीशी असणारी निष्ठा अनुकरणीयच!
भाऊंच भूमीशी आणि भूमिपुत्रांशी घट्ट नातं जोडलं गेलं, बांधलं गेलं ते आई गौराईंमुळे! आईने दिलेल्या सात हजार रुपयातून भाऊंच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. आई गौराईने भाऊंना या शब्दात जीवनाची दिशा दिली: “भवरू, तू असा एखादा व्यवसाय कर की, ज्यामुळे शेतकरी, भूमी, पशू, पक्षी, झाडे हे सारे जगतील.” माँ चे हे वाक्य भाऊंसाठी वेदवाक्य ठरले.
काळाची पावलं पुढे-पुढे झेपावत राहिली, वर्षामागून वर्षे उलटली.
भाऊंनी मनाच्या पाटीवर गिरवलं, जे गिरवलं ते आयुष्यभर कृतीत आणलं:
या मातीत राबराब राबले पाहिजे. प्रयोग केले पाहिजे. ह्या भूमीत वाडवडील राबले, त्यांच्या परिश्रमाचा वारसा आपण पुढे चालवला पाहिजे. ह्या भूमीशी आपले अतूट बंध आहेत. या भूमीने आजवर सर्वांना अन्न, धान्य, फळं दिली. नि:स्वार्थ भावनेने ही धरतीमाता आपल्यावर उपकार करते. आपल्याला अपार आनंद देते, तिच्याशी आपण इमान राखलेच पाहिजे.
मायमातीसाठी प्रामाणिकपणे कठोर परिश्रम वेचणार्‍या मोठ्याभाऊंनी ‘जल हेच जीवन आणि जीवन हेच जल’ हाच ध्यास धरला. पाण्याचे संकलन-संवर्धन केले. पाण्याचा काटकसरीने वापर केला आणि तोच संस्कार सहकार्‍यांनाही दिला. आईचा शब्द भाऊंनी जीव की प्राण मानल्यामुळे पिकपाण्याशी रुजलेल नातं वैश्विक झालं. ‘ठिबक सिंचनाचे प्रणेते’ ठरलेल्या या जलसाधकाने कृषिक्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध केलं.
आज आई गौराई आणि मोठेभाऊ दोन्हीही देवमाणसं शरीररुपाने आपल्यात नाहीत.
या पृथ्वीतलावर मग उरते तरी काय? आयुष्याची श्रीशि‘क मोजायची-मापायची तरी कोणत्या पद्धतीने?
जन्माचं सार्थक करणारी श्रीशि‘क राहते ती कीर्तीच्या रुपानं, संस्कारांच्या नीतिमत्तेनं, वारसदारांच्या कर्तबगारीनं, संवेदनशीलतेच्या शुद्ध पाणीदार वागण्या-बोलण्यानं.
उष्ण वातावरणाने तगमगलेली ही तृषार्त पाखरं, ठिबक नळ्यांमधील पाण्याचा थेंबथेंब वेचून तहान भागवताहेत. जसे की, “थेंब थेंब पाणी, जिवनात चैतन् आणी”
‘मातीतला गंध ओला
चौखूर दिशांना
पाखरांचे पंख आम्हा
आभाळ पुरेना।’
सामाजिक बांधिलकी मानून काही माणसं आयुष्यभर कष्ट उपसत राहतात. आयुष्याच्या पूर्णविरामानंतरही त्यांनी रचलेल्या आगळ्यावेगळ्या कार्यसंस्कृतीच्या माध्यमातून जिवंत राहतात. त्यांचे अस्तित्व क्षणोक्षणी जाणवते, सर्वांना प्रेरणा देत घडवत राहते. हेच पुढच्या पिढीचे जीवन शिक्षण, हाच वसा आणि हाच वारसा!
‘हो! भाऊ तिथेच आहेत, जिथे ही पाखरं पाणी पिताहेत...’